"वेळ नाही
"वेळ नाही
बारा तासाचा प्रवास चार तासांवर आला,
तरी माणूस म्हणतोय – वेळ नाही.
बारा माणसांचं कुटुंब दोन माणसांवर आलं,
तरी माणूस म्हणतोय – वेळ नाही.
चार आठवड्यांनी मिळणारा निरोप आता चार सेकंदांत मिळतो,
तरी माणूस म्हणतोय – वेळ नाही.
"३० मिनिटं नाही तर फ्री" अशा ऑफर असताना,
तरी माणूस म्हणतोय – वेळ नाही.
कधी काळी दूरच्या माणसाचा चेहरा पाहायला वर्ष लागायची,
आज तो सेकंदात दिसतोय –
तरी माणूस म्हणतोय – वेळ नाही.
घरात वरखाली जायला लागणारा वेळ आणि श्रम,
आता लिफ्टने सेकंदात संपतोय,
तरी माणूस म्हणतोय – वेळ नाही.
बँकेच्या रांगेत तासनतास थांबणारा माणूस,
आता मोबाईलवर काही सेकंदांत व्यवहार करतो,
तरी माणूस म्हणतोय – वेळ नाही.
एकेकाळी काही आठवड्यांचा कालावधी लागणाऱ्या आरोग्य तपासण्या,
आता काही तासांत होतात,
तरी माणूस म्हणतोय – वेळ नाही.
अॅक्टिवा चालवताना एका हातात हँडल, दुसऱ्या हातात मोबाईल,
कारण थांबून बोलायला वेळ नसतो त्याला.
कार चालवताना एका हातात स्टेयरिंग, दुसऱ्या हातात व्हॉट्सअॅप,
कारण वेळ नसतो त्याला.
ट्रॅफिक जाम झाला की दोन लेन ओलांडून तिसरी तयार करतो,
कारण वेळ नसतो त्याला.
चार माणसांत बसला की, अस्वस्थपणे मोबाईलमध्ये बोटं घालतो,
कारण कुठेतरी जायचं असतं – वेळ नसतो त्याला.
एकटा असला की निवांत असतो,
पण समोर कोणीतरी आलं की चलबिचल होते,
कारण – वेळ नसतो त्याला.
पुस्तक वाचायला वेळ नाही,
आई-वडिलांना फोन करायला वेळ नाही,
मित्राला भेटायला वेळ नाही,
निसर्गात रमायला वेळ नाही…
पण –
आयपीएलसाठी वेळ आहे,
नेटफ्लिक्ससाठी वेळ आहे,
सटरफटर रील्ससाठी वेळ आहे,
राजकारणावर चर्चा करायला वेळ आहे,
पण स्वतःसाठी वेळ नाही त्याला…
जग सोपं झालं, गती वाढली,
तंत्रज्ञान जवळ आलं, अंतरं संपली,
सोयी वाढल्या, संधी वाढल्या…
पण माणूस "वेळ नाही" म्हणत स्वतःपासून दूर गेला.
शांत बसून स्वतःशी बोलायला,
स्वतःला समजून घ्यायला,
किंवा फक्त काही क्षण निखळ हसायला…
वेळ नाही म्हणतो तो.
आणि मग एक दिवस वेळच निघून जातो.
शेवटच्या क्षणी कळतं –
वेळ होती… पण आपणच "वेळ नाही" असं म्हणत जगायला विसरलो होतो.
म्हणून आजच ठरवा –
स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा,
नात्यांसाठी थोडा वेळ देऊन बघा,
मनासाठी, शांतीसाठी, आयुष्याच्या गाभ्यासाठी
थोडा वेळ जगून बघा.
कारण "वेळ नाही" हे सत्य नाही,
ते फक्त एक सवय झाली आहे… आणि ती बदलायला हवी.
लेखक – अज्ञात,
Comments
Post a Comment