कसे काय सुचते ?
कसे काय सुचते ?
आपल्या आलीशान क्याडीलॅक गाडीतून जयकीशन ऑपेरा हाऊस येथील पन्नालाल मॅन्शन मधून तडक बाहेर पडले व ड्रायव्हरला त्याच्या अत्यंत आवडीच्या गेलॉर्ड्स मधे नेण्यास सांगितले.
मरीन ड्राइव्हचा तो रस्ता त्याचा सगळ्यांत आवडता.
त्यात ओली संध्याकाळ, सूर्य नुकताच पश्चिम क्षितिजावर लुप्त होण्याच्या मार्गावर होता.
अशी उदास संध्याकाळ जयकीशनना नेहमीच भारावून ठेवत असे. कित्येक गाण्याच्या चाली अशाच काहीशा धूसर संध्याकाळी त्यांना सुचल्या असतील. म्हणूनच मारवा हा त्याचा सगळ्यांत आवडता राग हे तो नेहमी सांगायचा.
पन्नालाल मॅन्शनमधून निघताना त्याने आधीच फोन करुन ठेवला होता. गेलॉर्ड्स ...
त्यांचे एक खास टेबल, एक कोपरा. आपल्या खास टेबलावर विराजमान होता होता त्यांनी नेहमीच्याच सुरात "ब्लॅक विथ आइस, एन्ड सोडा ऑन द साइड" ही ऑर्डर दिली.
खरंतर त्यांची ऑर्डर त्यांना कधी द्यावीही लागली नसेल, पण या वाक्यानेच त्यांची सुरुवात तिथे होत असे.
आज त्यांनी अजुन एका वाक्याची भर घातली ... " आज मुझे कोई डिस्टर्ब नही करेगा ...
और
जबतक मै ना कहू तबतक मेरा पेग रिपिट करते रहेना" ....
१९५५ चा काळ. हसरतच्या एका गीताला चाल सुचत नव्हती.
या गाण्याने त्यांना कदाचित बरांच त्रास दिला असणार. खरंतर शंकर आणि जयकिशन यांच्यामधे एक करार होता आणि तो म्हणजे कुठली चाल कोणी बांधली हे कधी उघड करायचं नाही, तरीसुद्धा जयकीशन या नावाची जादू कित्येक गाण्यांमधे आपल्याला लगेच दिसून येते.
‘बंसडा’ या गुजरात मधल्या पांचाळ समाजातील एक सुतारकाम करणारा तरुण; हिंदी चित्रपटसृष्टीत एखादी भूमिका मिळते का ते पहायला मुंबईत येतो आणि एक दर्जेदार संगीतकार होतो हा प्रवास थक्क करणारा आहे.
मुंबईत आल्यावर विनायक तांबे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवतो.
तसा तो उत्तम हार्मोनियम वादक पण शास्त्रीय संगीताची उपजत व उत्तम जाण असणारा व नेहमीच काहीतरी वेगळं करायचा ध्यास असणारा कलाकार.
तिथे त्यांची भेट गजानन वाटव्यांशी होते व ते वाटव्यांच्या प्रेमात पडतात ते कायमचे.
असं म्हणतात वाटव्यांची जवळ जवळ सगळीच गाणी (मराठी) त्या काळी जयकीशन यांना मुखोद्गत होती. वाटव्यांचा ते एक महान चाहते व निस्सिम भक्त होते.
जयकीशन हे वाटव्यांचा किती मोठे चाहते होते हे, १९७० साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटामध्ये त्यांनीच संगीतबद्ध केलेले “जाने कहॅा गये वोह दिन” या हसरतच्या गाण्यावरून लक्षात येतं. हे गीत त्यांनी १९४८ साली स्वरबद्ध झालेल्या वाटव्यांच्या एका भावगीतावरून घेतलं जे शिवरंजनी रागात त्यांनी बांधलं होतं ते म्हणजे “मोहुनिया तुज संगे, नयन खेळले जुगार” ही कवी राजा बढे यांची अप्रतिम रचना. ही गोष्ट सर्वश्रृत आहे, तसा जयकीशन यांनी वेळोवेळी खुलासाही केला आहे.
खरं म्हणजे गजानन वाटव्यांचे आपण ऋणी असायला हवं ज्यांनी मराठी मनामधे कविता व भावगीतं रुजवली.
ज्या गाण्यावर ते अडकले होते व त्यांना चाल सापडत नव्हती त्या गाण्याचा जन्म आज तिथे गेलॉर्डस मधे होवू घातला होता.
पन्नालाल मॅन्शनमधे काही कामानिमित्त गेले असताना रेडियोवर गजानन वाटव्यांचे एक गीत लागलं. १९४६ साली ध्वनीमुद्रीत झालेलं व कदाचित काळाच्या पडद्याआड गेलेलं ते गीत जयकीशन यांच्या नसानसांत उतरलं. याच्या आधी कसं काय आपण हे ऐकलं नाही याचं त्यांना राहून-राहून आश्चर्य वाटत होतं.
हॉटेलमधे गर्दी असल्यामुळे हार्मोनियमही मागवू शकत नव्हते. एक हार्मोनियम त्यांच्या गाडीमधे कायमस्वरुपी असायची.
काही तासांच्या झटापटीनंतर त्या गीताला चाल लागली तो पर्यंत ३-४ पेग झाले होते.
ते तसेच उठले, एका नुकताच नोकरीवर लागलेल्या वेटरने बिल आणून दिलं. त्या बिलाच्या मागे त्यांनी फक्त तारीख लिहिली व सही केली आणि तडक गाडी मरीन ड्राइव्हवर घ्यायला सांगितली. हार्मोनियम काढली व गाडीमधेच या गीताच अंतरा व मुखडा तयार केला.
त्या गाण्याच्या मुखडा व अंतऱ्यामधे त्यांना काहीतरी वेगळं हवं होतं, पण ते काही जमत नव्हतं.
वाटवे मुंबईत नव्हते, त्यामुळे जयकीशनजी अस्वस्थ झाले. पण एक-दोन दिवसांत वाटव्यांची भेट घेऊन हे गीत मी तुमच्या एका गाण्यावरून उचललं हे मनमोकळेपणानं सांगून आता मला थोडी मदत करा.
मधे काहीतरी कमी आहे. वाटव्यांनी त्याला "उचलणं" आणि "प्रेरित होणं (Inspired), सुचणं" यातला सूक्ष्म फरक सांगितला.
त्यातही एक तरल सीमारेषा असते. तेव्हा तू जे काही केलंस ते कौतूकास्पदच आहे. वाटव्यांनी शांतपणे गाण्याची सिच्युएशन ऐकून घेतली आणि अरे इतकच ना मग हे अमूक-तमूकची भर घाल. एका नितांत सुंदर गीताचा जन्म हा असा झाला. हे गीत फार गाजलं.
तो चित्रपट होता "चोरी-चोरी" व गीत होतं "पंछी बनू उडती फिरु मस्त गगन में, आज मै आझाद हूं दुनिया की चमन मे" आणि वाटव्यांचं मूळ गीत होतं "फांद्यावरी बांधीले ग मुलींनी हिंदोळे ... पंचमीचा सण आला डोळे माझे ओले".
जे वाटव्यांनी सुचवलं होतं ते होतं "हिल्लोरीssss"
Comments
Post a Comment