"टॅक्सी ड्रायव्हर"...
"टॅक्सी ड्रायव्हर"...
देवआनंद आणि थोरले बंधू चेतन आनंद यांनी "नवकेतन फिल्म्स" ही संस्था १९४९ साली स्थापन केली. त्या बॅनरचा "अफसर {देव आनंद, सुरैया}हा पहिला चित्रपट होता. त्यानंतर "बाजी" ने जोरदार यश मिळविले. नंतरचे "आंधिया"{देव-निम्मी} आणि "हमसफर" {देव-कल्पना कार्तिक} ठीक ठीक चालले.
पुढचा विषय देवने असा निवडला जो आम जनतेच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मुंबईचा "टॅक्सी ड्राईव्हर"... कथा विजय आनंद आणि चेतन आनंद च्या पत्नी उमा आनंद यांची होती. विजय आनंद त्यावेळी अवघे १९ वर्षांचे होते. याचे दिग्दर्शक आणि पटकथाकार चेतन आनंद!
टॅक्सी ड्रायव्हर मंगलच्या (देव आनंद) उमद्या दिलफेक स्वभावामुळे त्याचे सहकारी त्याला प्रेमाने "हीरो" म्हणत असतात. दिवसभर टॅक्सी चालवायची आणि रात्री मित्रांबरोबर क्लबमध्ये जाऊन जुगार आणि जोडीला "सिल्वी"चा (शीला रमाणी) दिलखेचक डान्स पहायचा असा त्याचा दिनक्रम असतो.
असंच एकदा संकटात सापडलेल्या असहाय्य तरुणीची माला ची (कल्पना कार्तिक) तो गुंडांपासून सुटका करतो. ती हिरोला तिची कहाणी सांगते. मालाच्या गावात कुणी रतनलाल नामक संगीतकाराने तिचे गाणे ऐकले असते. तिचा आवाज आवडल्यामुळे तो तिला स्वतःचा पत्ता देतो आणि मुंबईला बोलावतो. त्याच्या शोधात ती इथवर आलेली असते. देव तिच्यासह त्या रतनलालला शोधायचा खूप प्रयत्न करतो.ते दोघे दिल्या गेलेल्या पत्त्यावर पोचतात तर तो तिथून दुसरीकडे रहायला गेलेला असतो. तिला अशा अवस्थेत एकाकी कसे सोडणार म्हणून घरी घेऊन येतो.
इकडे देव वर सिल्वी मनापासून (एकतर्फी) प्रेम करत असते. दुसर्या दिवशी क्लबमध्ये गेल्यावर मस्ताना (जाॅनीवाकर)च्या बोलण्यातून सिल्वी ला मालाबद्दल कळते. ती मनापासून चिडते आणि तिरस्काराने देवची "टॅक्सी ड्रायव्हर" म्हणून हेटाळणी करुन तुच्छतेने थुंकते. देवला ते जिव्हारी लागतं. कधीही दारु न पिणारा देव त्यादिवशी दुःख विसरण्यासाठी दारु पिऊन घरी येतो. एरवी स्रियांशी अतिशय सभ्यतेने वागणारा देव माला बरोथ फारच विचित्रपणे वागतो. त्याला समजावण्याचा ती खूप प्रयत्न करते. दुसर्या दिवशी जेव्हा दारुची धुंदी उतरते. तेव्हा तो तिची माफी मागतो. तिचा मूड ठीक करण्यासाठी तिला बाहेर फिरायला नेतो.
इथे मालाला जेव्हा सिल्वी विषयी कळते तेव्हा ती आपला अडसर नको म्हणून देवला सोडून जाते. काम शोधताना तिला खूप वाईट अनुभव येतात. देव तिला शोधायचा खूप प्रयत्न करतो. त्याला जाणवतं की तो माला प्रेमात पडला आहे. लोकांचे वाईट अनुभव आल्याने माला पुन्हा देव कडे परत येते. आता माला पुरुषाच्या वेशात देव च्या छोट्या खोलीत त्याचा क्लिनर बनून राहू लागते.
याच दरम्यान खुद्द रतनलालच कस्टमर म्हणून देवच्या टॅक्सीत बसतो. त्याचे घर माहीत झाल्याने देव मालाला तिकडे सोडायचे ठरवतो. ती नाही म्हणते पण गुंड त्यांच्या मागावर असतातच म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने देव तिला रतनलालच्या बंगल्यावर सोडतो. पुढे काय होते? ती गायिका बनते कां? सिल्वीचे काय होते? माला देवचे मिलन होते कां? ते गुंड मालाच्या मागे कां असतात?
सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हरचे जीवन दाखवताना अपरिहार्यपणे त्यावेळच्या मुंबईची अनेक दृष्ये आहेत जी एका टॅक्सीच्या मागे कॅमेरा बांधून घेतली आहेत. मुंबईच्या सुप्रसिध्द ताजमहाल हॉटेलच्या परिसरातील काही दृष्ये तर अप्रतिमच! असं वाचलंय की देवला खरा टॅक्सी ड्रायव्हर समजून एक दोघांनी कुलाबा, व्हि टी स्टेशनला सोडायला सांगितले होते आणि देवने ही खराखुरा ड्रायव्हर बनून कमाई पण केलेली. यात देवने 1947 Chevrolet fleetmaster 4 doorsport sedan ही टॅक्सी वापरली आहे.
टॅक्सी ड्रायव्हरच्या साध्यासुध्या वेशातही देव जबरदस्त दिसतो. त्याची कॅप ही खासच! यात त्याने त्याच्या स्टाईलने गुंडांशी थोडीफार फायटींगही केली आहे. (हसू नका. देव चार्मर आहे. त्याला सर्व माफ आहे.) यात क्लब डान्सर "सिल्व्ही चे "डान्स परफॉर्मन्सेस खूप वेधक आहेत. त्यावेळचा प्रसिध्द "Jazz Band " Vernon Corke , Bettie Corke आणि त्यांची मुले Noel & Elen यांचा क्लब मध्यो शीला रमाणी बरोबर परफॉर्मन्स आहे.
देवच्या जिवलग मित्राच्या भूमिकेत "मस्ताना" अर्थात जॉनीवॉकर यांनी पण धमाल केली आहे. क्लबमधे नियमित जुगार खेळण्यासाठी येणारा देवचा मित्र रशीद खानही आहे जो देवच्या हरएक चित्रपटात असतोच! या सर्व मित्रांचे "चाहे कोई खुश हो चाहे गालिया हजार दो" हे गाणे खूपच धमाल!. किशोरदांबरोबर जॉनीभाईंनी "अरे मस्तराम बनखेके जिंदगीके दिन गुजार दो" असे म्हणत आपला चिरका आवाज मिसळलाय.
कल्पना कार्तिक (मोना सिंगा) त्या वेळी अगदी नवीन होती. मिस "सिमला" हा किताब जिंकल्यावर ती अभिनेत्री म्हणून आली होती. नवकेतन च्या "बाजी" मध्ये ती सहनायिका होती. त्याच काळात देव आणि तिचे प्रेम जमले आणि या चित्रपटाच्या शूटींग दरम्यान एका लंचब्रेक मध्ये त्यांनी गुपचुप रजिस्टर लग्न केले आणि परत शूटींगला हजर झाले. कोणाच्या नाही पण सिनेमॅटोग्राफर "व्ही रात्रा" यांच्या लक्षात आले कारण कंटीन्यूटी पहाताना ब्रेकनंतरच्या शूटींगमध्ये कल्पनाच्या बोटात अंगठी होती जी आधी नव्हती.
या चित्रपटाची गीते साहीर लुधियानवी यांची असून सदाबहार संगीत सचिन देव बर्मन यांचे आहे. सगळीच गाणी एक से बढकर एक आहेत. यातले "जाए तो जाए कहाँ" हे गीत रफीं ऐवजी तलत मेहमूद कडून गाऊन घेण्याबाबत सचिनदा आग्रही होते. त्यांचा तो निर्णय अचूक होता कारण तलतच्या मखमली आवाजातील दर्द आपल्याला अधिक भावतो. त्यावर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार सचिनदांना याच गाण्यासाठी मिळाला.
हा चित्रपट मिनर्व्हा टॉकीजमध्ये रिलीज झाला होता. टॅक्सी युनियनच्या सर्व टॅक्सीवाल्यांना चित्रपटाच्या प्रिमियरला आमंत्रण होते. थिएटरबाहेर टॅक्सींची रांग लागली होती. चित्रपट पाहून बाहेर आल्यावर त्यांची भावना होती, "ये हमारी ही पिक्चर है और देव साब हमारे हीरो है!"डोक्याला अजिबात ताप नाही मस्त, सुरेल टाईमपास म्हणजे हा चित्रपट
Comments
Post a Comment