शिवराजभूषण '

 शिवराजभूषण ' 

हा छत्रपती शिवरायांच्या चरीत्राने प्रभावित होऊन लिहीलेला काव्य ग्रंथ म्हणजे अखंड तेवणारा नंदादीप आहे. साडे तीनशे वर्षे उलटून गेली तरी हा अखंड प्रकाश देत आहे, शिव भक्तांना प्रेरणा देत आहे. मधल्या काळात हे काव्य दुर्लक्षिले गेले, जाणिवपुर्वक बाजूला सारले गेले. जिथे छत्रपती शिवरायांचे चरीत्रच आमच्या राजकीय नेत्यांना अडचणीचे वाटू लागले होते तिथे भूषणाची काय कथा! ही अवहेलनेची प्रदीर्घ काळरात्र सर्वच देशभक्तांना विस्मरणात ढकलणारी ठरली. पण खरे सोने हे अंधारात देखील चमकतेच ना ?

स्वातंत्र्यानंतर पुढे चाळीस वर्षे भूषणाचे छंद पुर्नप्रकाशीत झाले नाहीत. पण दुर्ग भ्रमण करणाऱ्या शिवभक्तांच्या जिव्हेवर हे ओजस्वी छंद अखंडपणे प्रगट होत व उसळत राहीले. स्वर्गीय निनादराव बेडकर यांनी हा ग्रंथ पुर्नप्रकाशित केला आणि महाराष्ट्र खडबडून जागा झाला. पुन्हा एकदा भूषणाच्या छंदांकडे महाराष्ट्रातील अबालवृद्ध आकृष्ट झाले. शिवरायांवरील मराठी सिरीयलचे टायटल साँग हे भूषणाच्या छंदावर आधारीत होते. 'इंद्र जीमी जंभपर' हा छंद युवा पिढीच्या गळ्यातला ताईत ठरला. तरुणाईच्या मोबाईलवर मोबाईल ट्यून म्हणुन हा छंद लोकप्रिय ठरला. या छंदाचा अर्थ समजत नसूनही या छंदाने मराठी मनाला असे वेड लावले. मग हे छंद मराठीतुन लिहीले तर, हा विचार मनात आला. त्यातून 'मराठी शिवभूषण ' हे पुस्तक जन्माला आले. कोणत्याही वितरका शिवाय ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले आणि आता भूषणाच्या जीवनावर आधारीत नाटक रंगमंचावर येत आहे. या नाटकाचे निमार्ते श्री. भूषण साटम व दिग्दर्शक श्री. गणेश मेस्त्री या दोघांनी माझ्या मागे लागून हे नाटक लिहुनच घेतले. ६जुन ला हे नाटक मालवणच्या मामा वरेकर नाट्यगृहात रंगमंचावर यायचे होते आणि २५ एप्रिलला या नाटकाच्या लिखाणास मी सुरवात केली. अक्षरशः दहा दिवसांत हे नाटक लिहुन पूर्ण केले. अवघ्या एका महिन्यात हे रंगभूमीवर आणणे ही सामान्य गोष्ट नव्हे पण मालवणच्या या शिवप्रेमींनी ही गोष्ट प्रत्यक्षात आणलेली दिसतेय. त्यांच्या जिद्दीला सलाम. छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने मावळे अमवासेच्या रात्री देखील साल्हेरी, सिंहगडा सारखे किल्ले सहज पायी सर करतात. असे कविराज भूषणाने आपल्या काव्यात वर्णन केले आहे. शिवरायांचे हे आजचे मालवणातील मावळे देखील त्याच तोलामोलाचे आहेत. याचे प्रत्यक्ष दर्शन मला या निमित्ताने घडले.

हे नाटक सर्व शिवप्रेमीच्या सहकार्यातून साकार होणार आहे. त्यामुळे त्याला २१ रुपये संकल्प मूल्य ठेवले आहे. शिवरायांनी तिथी नुसार राजाभिषेक समारंभ केला होता, तो जेष्ठ शुद्ध त्रयोदशी शक १५९६ ला. या १५९६ ची बेरीज केली की ती संख्या येते २१. त्यामुळे २१ रुपये हे संकल्प मूल्य ठेवण्यात आले आहे. नाटकाला येणाऱ्या प्रत्येकाने हे संकल्प मूल्य द्यायचे आहे. अगदी नाटकाचे लेखक, निर्माते, दिग्दर्शक व प्रमुख पाहुणे यांनी सुद्धा हे शुल्क द्यायचे आहे. हा शिवप्रेमाचा जागर आहे. आपल्या अस्मीतेचा, स्वत्वाचा, स्वातंत्र्य मुल्यांचा हा जागर आहे. त्यामूळे प्रत्येक जण त्यात सहभागी होणार आहे. ६ जुन व ७ जुन हे दोन दिवस मालवणात हे नाटक सादर होणार आहे. त्याचे संकल्प मूल्य हे २१ रुपये असणार आहे. या नंतर सर्व मंडळी जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला रायगडावरील राजाभिषेक समारोहाला जायची आहेत. अनेक ठीकाणहून आताच नाट्य प्रयोग लावण्या विषयी  विचारणा होत आहे. हे शिवकार्य आहे. हे शितीजा पल्याड जाणार आहे. या कार्यात मला खारीचा वाटा मला उचलता आला, हे माझ भाग्य आहे.

Comments

Popular Posts